माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांची मागणी
पिंपरी :– निगडी प्रभाग क्र.१३ मधील से.क्र. २२ या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयातील मोकळ्या जागेत प्रशस्त रुग्णालय व्हावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु, अपुऱ्या निधी अभावी अद्यापही रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.यामुळे आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.
याबाबत उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “येणाऱ्या काळात आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य मानून उत्तम उपचार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. प्रभाग क्र.१३ यमुनानगर रुग्णालयात विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाचे नूतनीकरण व विस्तारीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पालिका प्रशासनाकडे रुग्णालय विस्तारीकरणा संदर्भातील पत्र देत दि.२६/१०/२०२१ रोजी मागणी केली होती. परंतु कोविड परिस्थिती व प्रशासक या कारणांमुळे निधीची कमतरता महापालिकेने भेडसावत असल्याचे आम्हा सांगण्यात आले होते. पर्यायाने आपण कंपन्यांच्या सीएसआर फंडातून दवाखान्यात तात्पुरत्या स्वरूपाची विकास कामे करीत सहकार्य केले आहे. परंतु सध्या या कामातून पुर्ण रुग्णालयाचे विस्तारीकरण होणार नाही, त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयात महिला प्रसूतिगृह, ओपीडी तसेच अनेक उपचार होत असतात. रुपीनगर, तळवडे, सेक्टर नं.२२, निगडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर, कृष्णानगर, सहयोगनगर या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी कमी दरात उपचार मिळतात व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे अशा रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांनी सुद्धा प्रशासनाकडे यमुनानगर रुग्णालयाच्या विस्तारीकरणा बाबत पत्रव्यवहार केलेला आहे. सदर दवाखान्यातील वाढती गर्दी पाहता सध्याची इमारत अपुरी पडत आहे.
या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी कोणतेही शासकीय रुग्णालय नाही. रात्री-अपरात्री नागरिकांना अत्यावश्यक परिस्थिती उद्भवल्यास पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात जावे लागते. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल दवाखान्याच्या धर्तीवर यमुना नगर दवाखाना १००बेडचे/खाटांचा दवाखाना,तसेच अतिदक्षता विभाग(I.C.U) करण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाबी लक्षात घेता येथे प्रशस्त रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या अति आवश्यक बाबी बाबत सकारात्मक विचार करून या आर्थिक वर्षात यमुनानगर रुग्णालयासाठी अंदाजपत्रकीय रक्कम व तरतूदीचा समावेश करण्यात यावा व रुग्णालयाच्या निर्मितीबाबत योग्य ते पाऊल उचलण्यात यावे, अशी मागणी मा.नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.