पिंपरी :- चीनमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतातही तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओडीसामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार, भारतात येणाऱ्या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाला करोनाची लक्षणं दिसल्यास त्याला विमानतळावरच विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर प्रवाशांची थर्मल स्क्रीनींग करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात येणार आहे. या आरटी-पीसीआर चाचणीतून १२ वर्षांखालील मुलांना सूट देण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लक्षणं आढळल्यास त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.
भारतात येणाऱ्या कोणताही प्रवाशाला करोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी जवळच्या आरोग्यात जाऊन तपासणी करावी किंवा करोना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असेही केंद्र सरकारकडून जारी नव्या नियमावलीतून सांगण्यात आले आहे.