महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांच्या अनुषंगाने अर्ज सादर करताना अर्जासोबत सादर करावयाच्या परीक्षा शुल्काचा भरणा करताना उमेदवारांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे तसेच अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला असल्याची कोणतीही खात्री करत नसल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आली आहे. अर्ज सादर करताना आवश्यक खबरदारी न घेतल्याने काही उमेदवारांची परीक्षेची संधी वाया गेल्याचेही निदर्शनास येते. सदर वस्तुस्थिती विचारात घेता अर्जासोबत परीक्षा शुल्क सादर करताना उमेदवारांनी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी :-
(१) ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याबाबत आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर संदेश प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरील पृष्ठावरुन आणि/अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.
(२) कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षा शुल्काचा भरणा ऑफलाईन पध्दतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल. चलनाची प्रत घेतल्यानंतर किमान ३ तासानंतर भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत कार्यालयीन वेळेत चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल.
२. उमेदवारांनी परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाल्याची स्वत: खात्री करावी. यासंदर्भात, आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमधील सूचना क्रमांक १.२.६.२ मधील तरतुदीचे अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
३. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबधित भरतीप्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही. तसेच विहित मुदतीनंतर यासंदर्भातील उमेदवारांच्या अभिवेदनाच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही.
याबाबत सहसचिव माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी पत्राद्वारे कळविले आहे.