मुंबई : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या संपाचा फटका आता सामान्य नागरिकांना होऊ लागला आहे. पुणे, नाशिक,बारामती, कोलाड, गुहागर, बुलढाणा या भागात फटका बसलाय. अनेक ठिकाणी वीज नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झाल्यची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात विज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच, धायरी, कात्रज, शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसराला बंदचा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात विज नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. रत्नागिरी शहर वगळता राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यातील वीज गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.
महावितरणाच्या संपाचा विदर्भालाही फटका बसला आहे. विज निर्मीत अग्रेसर असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीवर या परिणाम झाला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद, युनिट 4 मध्ये एअर हीटर ची समस्या उदभवली आहे तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट कऱण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झालेत. दरम्यान, भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा नाही आहे. लाखांदूरमध्ये पहाटेपासून वीजपुरवठा खंडीत आहेत.
कंपन्यांचे खाजगीकरण करू नये या प्रमुख मागणीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीही कृती न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर राज्यभरातील वीज वितरणचे कर्मचारी संपावर जात आहेत. काल मध्यरात्री पासून 72 तासांचा हा संप पुकारला असून यामध्ये राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहे. दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.





















