पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात मिळकतकर वसुलीचे अभियान सुरू आहे. करासाठी नळजोड तोडण्याच्या मोहिमेवर सामाजिक संस्थांनी आक्षेप नोंदविले. त्यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला पाहिजे. थकीत मालमत्ताधारकांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत. त्यांचे नळजोड तोडण्यात येत आहेत. कराचा भरणा न केल्यास नळजोड तोडले जातील. नळजोड तोडण्याची कारवाई नियमबाह्य नाही, असेही शेखर सिंह यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात ५ लाख ९० हजार निवासी व बिगरनिवासी मालमत्तांची नोंद महापालिकेकडे आहे. आतापर्यंत ५६५ कोटी रुपये मालमत्ताकराचा भरणा झाला आहे. १ लाख ६२ हजार निवासी मालमत्ताधारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून मूळ मालमत्ताकरांची ४८० कोटींची थकबाकी आहे.
ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने जप्ती मोहिमेसह, नळजोड तोडण्याचीही कारवाई सुरू आहे. कर थकविणाऱ्यांचे नळजोड तोडले जात आहे. याबाबत आयुक्तांना पत्रकारांनी विचारले त्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काही थकबाकीदारांसाठी संपूर्ण सोसायटीचे नळजोड तोडणे योग्य आहे का? याबाबत विचारले असता आयुक्त सिंह म्हणाले, मालमत्ताकर न भरणाऱ्यांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका वेगळे असे काही करत नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
एखाद्या सोसायटीतील काही लोकांनी कर भरला नसेल. तर, संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र, वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.