पिंपरी – केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली प्राधिकरण सेक्टर क्रमांक 17 व 19 येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून घरकुल प्रकल्पातील 4 गृहप्रकल्पांची सोडत महापौर शंकुतला धराडे यांच्या हस्ते काढण्यात आली.
संत तुकाराम नगर पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, नियोजित सोसायट्यांचे अध्यक्ष मधुकर आहेर, विजय चव्हाण, लक्ष्मण दौंडकर, भीम नलावडे आदी मान्यवर तसेच घरकुल योजनेतील लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी 4 सोसायटयांच्या इमारतीमधील 168 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत महापौरांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आलेल्या अध्यक्षांचा सत्कार महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे यांनी केले, सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.