पिंपरी : भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आरोप केलेले नाहीत. पुराव्यासह भ्रष्टाचार सिद्ध केला आहे. प्रशासनाच्या चौकशीत भ्रष्टाचार समोर आलेला आहे. त्याचे अहवाल सादर झाले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांचे आहे. मात्र भ्रष्टाचारात स्वतः राष्ट्रवादीच बरबटलेली असल्यामुळे सिद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास शहरात पाय ठेवणार नाही, अशी भाषा करणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आता कोलांटउडी मारत आहेत. हा खोटेपणा जनता सहन करणार नाही. अजित पवार यांनी ज्योतिष आणि कुंडल्यांची भाषा करण्याऐवजी सिद्ध झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलावे, असे खुले आव्हान भाजपचे खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रवादीला दिले आहे.
अजित पवार हे महापालिकेत भ्रष्टाचार झालेलाच नाही, असे वारंवार सांगत आहेत. भाजप भ्रष्टाचाराचे केवळ आरोप करत आहे. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा भाजपचा डाव असल्याचे अजित पवार यांचे म्हणणे आहे. त्याला भाजप खासदार अमर साबळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार साबळे म्हणाले, भाजपने राष्ट्रवादीवर कोणतेही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत. महापालिकेत जो काही भ्रष्ट कारभार सुरू आहे, त्याचे पुरावेच राष्ट्रवादीला आणि प्रशासनाला दिले आहेत.
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे आणि करदात्यांच्या प्रत्येक रुपयाचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. परंतु, राष्ट्रवादीने सत्तेचा वापर केवळ लूट करण्यासाठी केला आहे.
खुद्द अजित पवार यांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यावरून भ्रष्टाचारामध्ये राष्ट्रवादी स्वतः सामील असल्यामुळेच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहते, हे स्पष्ट होते. भाजपने भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणात पुरावे दिले आहेत. त्या पुराव्याबाबत राष्ट्रवादीने बोलावे. शहरातील जनतेने लाखाची वस्तू कोट्यावधी रुपयांना खरेदी करून राष्ट्रवादीला स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी सत्ता दिलेली नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत भ्रष्टाचाराचे एक जरी प्रकरण सिद्ध झाले, तर शहरात पाय ठेवणार नसल्याचे म्हटले होते.
आता आम्ही नाही तर प्रशासनानेच भ्रष्टाचार सिद्ध झालेले अहवाल दिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी कोलांटउडी न मारता सिद्ध झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलावे. जोतिष आणि कुंडल्यांची भाषा करून शहरातील जनतेची दिशाभूल करू नये, असे खुले आव्हान साबळे यांनी राष्ट्रवादीला दिले आहे.























