पिंपळे निलख येथे नांदगुडे फाऊंडेशनतर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
पिंपरी : अनेक वर्ष पिंपरी चिंचवडच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले. सर्व जातीधर्मांच्या लोकांना हे शहर आपले वाटले पाहिजे अशी विकास कामे केली. त्यामुळेच शहराला केंद्र सरकारचा ‘बेस्ट सिटी पुरस्कार’ मिळाला. अशा परिस्थितीत भाजपाकडे आमच्या विरोधात काहीच मुद्दा नसल्याने बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पिंपळे निलख विशालनगर येथील युवकांच्या क्रिडागुणांना संधी मिळावी म्हणून नांदगुडे पाटील फाऊंडेशनच्या ज्येष्ठ नगरसेवक विलास नांदगुडे यांच्या वतीने भव्य टेनिस बॉलच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती सुलोचना नांदगुडे, संयोजक विलास नांदगुडे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, नगरसेवक योगेश बहल, संजय नाना काटे, शमीम पठाण, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक हनुमंत खोमणे, शकुंतला साठे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष मयुर कलाटे, ज्येष्ठ नागरिक सुदाम कामठे, बाजीराव बालवडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र साठे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी विशालनगर येथील छत्रपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर 10 एकर परिसरात कै. प्रकाश दत्तोबा थोपटे स्टेडीयम मध्ये 5000 प्रेक्षक क्षमता असणारी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास प्रथम क्रमांक 25 लाख रुपये आणि कै. एकनाथराव नांदगुडे यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुलोचना नांदगुडे यांच्या वतीने चषक, दुसऱ्या क्रमांकास 15 लाख रुपये आणि कै. रामचंद्रबूवा बालवडकर यांच्या स्मरणार्थ अशोकराव बालवडकर यांच्या वतीने चषक तृतीय क्रमांकास 10 लाख रुपये, आणि कै. सुरेशराव टकले यांच्या स्मरणार्थ प्रकाश टकले यांच्या वतीने चषक, चतुर्थ क्रमांकास 5 लाख रुपये आणि कै. वसंतराव जगताप यांच्या स्मरणार्थ प्रशांत जगताप यांच्या वतीने चषक, शिस्तबध्द संघास 3 लाख रुपये आणि कै. सुधीर सुर्वे स्मरणार्थ विक्रांत सुर्वे यांच्या वतीने चषक. वैयक्तिक बक्षीसांमध्ये सर्वाधिक षटकार करणा-या खेळाडूस, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज यांना प्रत्येकी 1 लाख रुपये. मॅन ऑफ द डे विजेत्यास 25 हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज किताब पटकावणा-या खेळाडूस मारुती अल्टो कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्वागत विलास नांदगुडे, सुत्रसंचालन मोती मुदलियार, आभार राजू गोसावी यांनी मानले.




















