‘लक्ष्य 2017’ चर्चासत्रातून उमटले सूर
पिंपरी : ‘मतदारांच्या अडी-अडचणीला धावून जाणाऱ्या, शहर विकासाची दृष्टी असलेल्या, उमेदवाराला निवडून दिले पाहिजे. सदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, अशी अपेक्षा ‘लक्ष्य 2017’ पत्रकारांच्या नजरेतून या चर्चासत्रातून व्यक्त करण्यात आली. तसेच पेडन्यूज ही पत्रकारितेला काळीमा फासणारी असून, नागरिकांनी सद्सद्विवेक बध्दीने मतदान करावे, असाही सूर या वेळी आळवण्यात आला.
अखिल प्राधिकरण नागरिक यांच्या वतीने निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात ‘लक्ष्य 2017’ पत्रकारांच्या नजरेतून हा आगळा-वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार अमर साबळे, विवेक इनामदार, विनोद पवार, भाजपचे संघटन सरचिटणीस माऊली थोरात, प्रकाश ढवळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर इंगवले, प्रा. सचिन काळभोर, सयोजक बाळा शिंदे आदी उपस्थित होते.
खासदार साबळे म्हणाले की, समाजातील चुका सकारात्मक पद्धतीने पत्रकारांनी टिपल्या पाहिजेत. व्यंग शोधून काढून सकारात्मकपणे मांडणी करणे हे पत्रकारांचे काम आहे. राजकारण्यांकडून असंसदीय भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, मात्र पत्रकरांनी अशा शब्दांना कात्री लावून योग्य ती बातमी लिहावी. चुकलेल्या व्यक्तींवर टीका करण्याचा लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. मात्र, व्यक्तीगत टीका करणे चुकीचे आहे. निवडणूक पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. दोषविरहीत निवडणूक पद्धत आणण्यासाठी प्रयत्न करणे गरेजेचे आहे. देशाचा नागरिक देशाचा मालक आहे. क्रांतिकारी निर्णय पार पाडण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
गुलामाला गुलामगिरीची जाणीव करुन द्यावी. त्यानंतर ते बंड करुन उठल्यासारखे राहणार नाहीत. मतदारांना राजा असल्याची जाणीव करुन द्यावी. तसेच मतदारांनीही पैसे घेऊन मतदान करू नये, अशी अपेक्षाही साबळे यांनी व्यक्त केली.
विवेक इनामदार म्हणाले की, निवडणूक आणि लोकशाही महत्त्वाची गोष्ट आहे.
भारताची लोकशाही जगातील मोठी लोकशाही असून संस्कारांमुळे ती अबाधित आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी निवडून देऊ शकतो. रक्तपात न करता सत्तापरिवर्तन करु शकतो. राजकरण हा नागरिकांच्या अंगात मुरलेला आणि भिनलेला विषय आहे. लोकांच्या भावनेचा जो लोकप्रतिनिधी विचार करतो तो टिकतो. जो लोकांचा विचार करत नाही तो काळाचा ओघात मागे पडतो. प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सध्या पक्षनिष्ठेला, तत्वाला महत्व राहिले नाही.