पिंपरी :- पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी भागात असलेल्या जुन्या टायरच्या गोडाऊनला मोठी आग लागली होती. मध्यरात्री २ च्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
रात्रीची वेळ असल्याने टायरच्या गोडाऊन मध्ये कोण नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग ज्या ठिकाणी लागली त्याच ठिकाणी बाजूला खाजगी रुग्णालय असल्याने सुरक्षितेचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना विविध रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. ४ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
टायर गोडाऊन शेजारी मॅक्स न्युरो हॉस्पिटल असल्यामुळे तेथील १९ रुग्ण अगोदर पासून भरती होते. त्यांना आगीचा धोका संभवत असल्याने त्वरित अन्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये न्युरो विभागाचे रुग्ण असल्याने काळजी पूर्वक स्थलांतर करणे आवश्यक होते. सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविणे व रुग्णालयास आगी पासून वाचविणे हे दोन्ही कार्य सोबत करण्यात आले. या बचाव कार्यात सारंग मंगळूरकर लिडिंग फायरमन आणि भूषण येवले फायरमन यांनी विशेष भूमिका बजावली.