निवडणूक विभागाकडून मार्गदर्शक प्रणाली जाहीर
पिंपरी :– २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार (दि.३१ ते दि. ७) या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) नामनिर्देशन पत्र क्षेत्रीय अधिकारी यांचा कक्ष, ३ रा मजला, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथे दाखल करता येईल. त्यापूर्वी व त्यानंतर नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी अथवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारेच नामनिर्देशनपत्र स्विकारले जातील. अन्य कोणीही स्वीकारु शकणार नाही.
हे नामनिर्देशन पत्र हे नमुना २ ब मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २ ब हा नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. उमेदवार स्वत: अथवा उमेदवराचा सुचक असे नामनिर्देशन पत्र दाखल करु शकेल. एका उमेदवारास जास्तीत जास्त ४ नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १७३ (अ) अन्वये शपथ उमेदवाराने स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष छाननीपुर्वी घेणे आवश्यक आहे. उमेदवार अन्य मतदारसंघातील मतदार असल्यास मतदार नोंदणी अधिकारी / सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचा दाखला छाननीपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष यांच्या उमेदवारांना एक सूचक व इतर उमेदवारांना १० सूचक याच मतदारसंघातील असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा मुळ A व B फॉर्म हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपूर्वी दाखल करणे बंधनकारक आहे.