पिंपरी :– पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, मालमत्ताधारक यांना निवडणूक लढवण्यासाठी तसेच अन्य कामांसाठी कर संकलन विभागाचा मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला (एनओसी) आवश्यक असतो. नागरिकांना हा दाखला घरबसल्या मिळावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने ऑनलाइन दाखल देण्याची सुविधा १ एप्रिल २०२२ पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. नागरिक www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरून हा दाखल मिळवू शकतात. कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना कर संकलन विभागाची एनओसी घेण्यासाठी आता महानगरपालिकेत अथवा महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. त्यासाठी त्यांना फक्त महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल. याच संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडील मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखल नागरिकांना ऑनलाईन मिळेल. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.