पिंपरी: विज्ञान दिनानिमीत्त आयोजित विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेत स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे धडे” घेतले. डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, चरक फार्मा प्रा. लि. आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांनी बक्षिसे जिंकली.
या स्पर्धेत यशस्वी इंग्लिश मेडीयम स्कुल, मोशी या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व संस्थापक सुभाष देवकाते यांच्यासह विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर, वाय. सी. एम. हॉस्पिटल आणि चरक फार्मा प्रा. लि. यांच्या मार्फत विविध उपक्रम आणि पिंपरी चिंचवड मनपा, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटीचा आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये, सायन्स पार्क मध्ये आलेल्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना हृदयविकाराच्या झटक्यातून बचावाचे धडे देण्यात आले. सायन्स पार्कचे सुनील पोटे, एन. टी. कासार, स्मार्ट सिटीचे बिनीश सुरेंदर, जस्टीन मॅथ्थु, किरण लवटे, आशिष चिकणे यांच्यासह अधिकारी – कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
वायसीएम रुग्णालयाचे उपअधीक्षक तथा भूलतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला अंदुरकर, अध्यक्षा एसएपीसी डॉ. सीमा सूर्यवंशी, सचिव डॉ. भावेश शेठ, एसएपीसी सदस्या डॉ. निलावती कसनाळे, समिती सदस्य यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. तसेच उपस्थित मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर यावेळी घेण्यात आले. एम. डी. आयुर्वेदिक डॉ. अर्चित वैद्य, चरक फार्मा प्रा. लि चे डॉ. अनुराग दलाल यावेळी उपस्थित होते. तसेच डॉ. स्नेहा जाधव यांनी “आयुर्वेद आणि भविष्यातील संधी” या विषयावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.