पिंपरी चिंचवड महापालिकेचे मूळ कर भरण्याचे थकबाकीदारांना आवाहन
नागरिकांच्या सेवेसाठी करसंकलन कार्यालये सुट्टीच्या दिवशी राहणार सुरू
पिंपरी :- अवैध बांधकामावर आकारली जाणारी शास्ती सर्व प्रकारच्या बांधकामांना माफ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारकडून शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध करण्यात आला. या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील 97,699 बांधकामांना फायदा होणार असला तरी त्यांच्याकडून मूळ कराचा भरणा केल्यानंतरच त्यांना शास्ती माफ होणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मूळ कर त्वरित भरुन शास्ती माफीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
हे शास्ती माफीचे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. संबंधित मालमत्ता धारकांनी मूळ कराचा संपूर्ण भरणा केल्यानंतर लगेचच हे प्रमाणपत्र त्यांना डाऊनलोड करता येईल. त्यासाठी कर संकलनाच्या संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच, शास्ती माफी ही शासन आदेशाच्या दिवसांपर्यंतच्या अवैध बांधकामांना लागू होणार आहे. ही माफ झालेली शास्ती ही कायमस्वरूपी असून निव्वळ याच वर्षापर्यंत नव्हे तर यापुढेही या बांधकामांना ही शास्ती लागू राहणार नाही.
यामध्ये अवैध बांधकाम शास्ती माफ म्हणजे ते बांधकाम नियमित झाले असे होणार नाही, हे सुद्धा शासन निर्णयामधून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या 3 मार्चपर्यंत अस्तित्वात असलेल्या अवैध बांधकाम असलेल्या मालमत्तांची नोंद संबंधित मालमत्ता धारक यांनी केली नसेल तर अशा मालमत्ता धारकांच्या बाबतीत काय धोरण असावे याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
तब्बल ३११ कोटी मूळ कर येणे बाकी…
अवैध बांधकामांवरची शास्ती माफ झाल्याने आता एकूण ३११.१७ कोटी मूळ कर येणे बाकी असून यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
३१ मार्च पर्यंत करसंकलन कार्यालये सुट्टीच्या दिवशीसुद्धा राहणार सुरु…
नागरिकांच्या सेवेसाठी मूळ कराचा भरणा करण्यासाठी करसंकलन कार्यालये ३१ मार्च पर्यंत साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तसेच कार्यालयीन वेळेनंतर सुद्धा अधिकचा वेळ कार्यालये सुरु ठेवून भरणा स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लाभ घेऊन मूळ मिळकत कर त्वरित भरावा, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदारांनो, मालमत्ता कर भरा, जप्ती टाळा..
ज्या नागरिकांनी मालमत्ता कर भरला नाही अशांची नावे लवकरच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. करसंकलन विभागाने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अभियान कडक केले असून थकबाकीदारांना थकीत मालमत्ता कर भरा व जप्ती टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.
अवैध बांधकामांची शास्ती माफ झाल्याने नागरिकांनी आता स्वतःहून मूळ कराचा संपूर्ण भरणा 31 मार्च अखेर करून पालिकेला सहकार्य करावे. यापुढे शहरात कुठलेही अवैध बांधकाम होणार नाही यासाठी पालिकेकडून कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. 3 मार्चनंतर होणाऱ्या बांधकामांना पूर्वीच्याच दराने शास्ती लागू राहणार आहे.
– शेखर सिंह, (आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका)