पिंपरीतील वाय. सी. एम. रुग्णालयाचे जेष्ठ दंत शल्यविशारद डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेल्या “ग्रंथाली”ने प्रकाशित केलेल्या “फर्स्ट जून चाईल्ड” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ . पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी:- आधुनिक काळात प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताणतणाव वाढत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये त्याचे प्रमाण सर्वाधिक दिसते. यावर मात करण्यासाठी डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेले “फर्स्ट जून चाइल्ड” हे आत्मकथन प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.
पिंपरीतील वाय. सी. एम. रुग्णालयाचे जेष्ठ दंत शल्यविशारद डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेल्या “ग्रंथाली”ने प्रकाशित केलेल्या “फर्स्ट जून चाईल्ड” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ . पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजशेखर अय्यर, सकाळ समूहाचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी, मुंबई दूरदर्शनचे माजी उपसंचालक भगवंत इंगळे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. लतिका भानुशाली आदी उपस्थित होते.
डॉ. यशवंत इंगळे यांच्या जीवनात संस्कार, संगत आणि शिक्षण या तीन गोष्टींचा सुंदर मिलाप झाल्याचे या पुस्तकात दिसते. जीवनातील अडथळ्यांवर आणि परिस्थितीवर मात करून यश मिळवलेल्या व्यक्तींची आत्मकथने भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात तसेच डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेले फर्स्ट जून चाईल्ड पुस्तक आहे . डॉ. यशवंत इंगळे यांच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास यात आहे. जन्मतारीख काय हे माहीत नाही. घरची गरिब परिस्थिती यावर मात करुन जिद्द, चिकाटी आणि मेहनत या जोरावर डॉ. इंगळे यांनी मिळवलेले यश हे आजच्या तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. मराठी साहित्यामध्ये अनेक नवे साहित्य सातत्याने येत असते. त्यामध्ये डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेले हे पुस्तक विशेष लक्ष वेधून घेणारे आहे. यशाचे शिखर गाठण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. आपण जे घडतो, आपल्या आयुष्याला जो आकार मिळतो, त्यामध्ये वाचन आणि साहित्य याचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे आपण साहित्याच्या प्रवाहापासून दूर न जाता कायम त्याच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे असेही डॉ. पी. डी. पाटील यावेळी म्हणाले.
बऱ्याचदा आत्मकथना कडे त्या व्यक्तीचे अनुभव म्हणूनच पहिले जाते. पण तसे न पाहाता आपले आयुष्य घडवण्यासाठी त्या मधल्या कोणत्या गोष्टी कशा सकारात्मक ठरू शकतील, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. सध्या वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. बहुतेकांना सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवय लागलेली आहे. त्यांनी वाचनाची गोडी देखील लावून घ्यायला हवी असे डॉ. राजशेखर अय्यर यांनी यावेळी सांगितले.
अशा आत्मकथनातून घेण्यासारखे खूप असते. त्यामुळे अशी पुस्तके वाचल्यानंतर त्यामधील कोणत्या गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त आहेत. याचा विचार करून त्याचे अवलोकन करावे. भविष्य घडवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो असे प्रसन्न जोशी यावेळी म्हणाले.
आपले आयुष्य घडत असताना आलेले अनुभव, शिक्षण घेत असताना उभे राहिलेले प्रश्न डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात पदव्यूत्तर अभ्याक्रमासाठी प्रवेश मिळवताना आलेले अनुभव डॉ. यशवंत इंगळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.
ग्रंथालीच्या विश्वस्त डॉ. ललिता भानुशाली यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे असणारी प्रकाशकांची भूमिका विशद केली. सुदेश हिंगलासपूरकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन महेश खरे यांनी आणि आभार डॉ. यशवंत इंगळे यांनी मानले.






















