आज शानदार उद्घाटन; दुपार नंतर 15 खेळांच्या लढतींना प्रारंभ
पिंपरी : (दि. 2 जानेवारी17) चिंचवड येथील बालाजी कला-क्रीडा ट्रस्ट संलग्न स्मिता वाल्हेकर स्पोर्टस अकॅडमीच्या वतीने आयोजित दुसर्या राज्यस्तरीय प्युपिल्स ऑलिंम्पिक गेम्स पुणे-2017 स्पर्धेत 15 जिल्हा संघातील तब्बल 3 हजार खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. दोन दिवशीय या स्पर्धेतून औरंगाबाद येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड केली जाणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक भरत वाल्हेकर यांनी दिली.
स्पर्धेत यजमान पुणे जिल्ह्यासह, उस्मानाबाद, बुलढाणा, सोलापूर, कोल्हापूर, बीड, सातारा, जालना, अकोला, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, नागपूर या जिल्हा संघाचे खेळाडूंचे आज सोमवारी (दि. 2) वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील स्पर्धा स्थळी आगमन झाले. स्पर्धकांची नोंदणी आणि वजने घेण्यात आली. रात्री लढतीचे ड्रॉ काढण्यात आले. क्रिकेट, फुटबॉल, अथलॅटिक्स, रोलर स्केटिंग, कबड्डी, कुस्ती, मुष्टियुद्ध, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, किंक-बॉक्सिंग, कराटे, योगा यासह नृत्य, रांगोळी, गायन, तबला व हार्मोनियम वादन आदी स्पर्धांमध्ये विविध वयोगटांत तब्बल 3 हजार स्पर्धक सहभागी होत आहेत.
मंगळवारी (दि.3) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत स्पर्धेचे शानदार उद्घाटन सोहळा वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील आहेर गार्डन क्रीडा संकुलात होणार आहे. उद्घाटन स्वाभिनामी संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी ऑलिंम्पिक खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते आजी-माजी खेळाडू आणि मार्गदर्शकांसह प्युपिल्स ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मेजर सुभाष ससाणे, प्राचार्या हरमिंदर राय, आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू संदीप कितर्णे, महाराष्ट्र प्युपिल्स ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सायराबानू शेख, क्रीडा भारतीचे सरचिटणीस राज चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
क्रीडा स्पर्धांना दुपारी दोनला सुरुवात केली जाणार आहे. मुष्टियुद्ध, अथलॅटिक्स, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, सांस्कृतिक स्पर्धा आहेर गार्डन क्रीडा संकुल येथे होणार आहेत. स्केटिंग आणि व्हॉलीबॉल लढती यमुनानगर, निगडीतील मिनाताई ठाकरे स्केटिंग हॉल येथे आणि फुटबॉल व बास्केटबॉलच्या लढती निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान येथे होतील. स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू, मार्गदर्शन, पंच आणि तांत्रिक अधिकार्यांची निवास, आहार आणि वाहतूक व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. या सोयीबद्दल खेळाडूंनी समाधान व्यक्त केले.
अखेरच्या दिवशी बुधवारी (दि.5) सायंकाळी सातला स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहेत. विजेत्या खेळाडूंची औरंगाबाद येथे 20 ते 22 जानेवारी या कालावधीत होणार्या दुसर्या राष्ट्रीय प्युपिल्स ऑलिंम्पिक स्टेट गेम्ससाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड केली जाणार आहे.