पिंपरी, दि. ६ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अँक्शन कमिटी अगेन्स्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टीस या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन्स व्हेंन्डीग आणि डिस्पोजल मशिनचे उदघाटन आज दुपारी महापौर, शकुंतला धराडे यांच्या हस्ते झाले. कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे झालेल्या या कार्यक्रमास सह आयुक्त दिलीप गावडे, वैद्यकिय अधिक्षक मनोज देशमुख, सहाय्यक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, आरोग्य निरीक्षक सलीम इनामदार, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, पी.आर.तावरे, मेट्रन मोनिका चव्हाण, सिस्टर इनचार्ज रोहिणी गोडसे, ललिता जाधव, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, अँक्शन कमिटी अगेन्सट अनफेअर मेडिकल पॅक्टीसचे अध्यक्ष राजेंद्रकुमार धेंडे, विक्रम भोसले, एकता भोसले, विरेंद्र सिंग पाटील, आदी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ऍक्शन कमिटी अगेनस्ट अनफेअर मेडीकल प्रॅक्टीस, सांगली यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबीलीटी अंतर्गत सॅनिटरी नॅपकीन्स व्हेंन्डीग आणि डिस्पोजल मशिन महानगरपालिका परिसरात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, शिवाजी विदयालय भोसरी, साई शारदा महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कासारवाडी, मोरया गोसावी सार्वजनिक स्वच्छतागृह या चार ठिकाणी बसविले आहेत. त्यापैकी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मशीनचे उद्घाटन आज झाले. या व्हेन्डींग मशीनमध्ये ५ रुपयाचे नाणे टाकलेनंतर सॅनीटरी नॅपकिन्स मिळणार आहेत. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकिन्स डिस्ट्रॉयर मशीनमध्ये टाकलेनंतर शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट होऊन त्याची राख होणार आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेची कोणतीही आर्थिक गुंतवणूक नसून केवळ जागा व विजेची सोय उपलब्ध करुन दिली आहे.