पिंपरी : प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, वाहतूक विभाग पुणे आणि झील एज्युकेशन सोसायटी न-हे पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने 9 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये ‘28 वे रस्ता सुरक्षा अभियान 2017’ राबवण्यात येत आहे. याच अभियानाअंतर्गत 12 जानेवारी जो संपूर्ण भारतामध्ये युवा दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवसाचे औचित्य साधून झील एजुकेशन सोसायटी नर्हेतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन दत्तवाडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड, संभाजी काटकर (संस्थापक संचालक, झील एज्युकेशन सोसायटी), जयेश काटकर (कार्यकारी संचालक, झील एज्युकेशन सोसायटी),डॉ.संजय देवकर (कॅम्पस डायरेक्टर, झील एज्युकेशन सोसायटी), डॉ.अजित काटे (प्राचार्य झील कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अॅण्ड रिसर्च यांच्या हस्ते झाले.
या रॅलीची सुरुवात सायकल वापरा प्रदूषण टाळा अशा घोषणा देत निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांकडून सकाळी 7 वाजता सारस बाग येथून झाली व ती 8.30 वाजता झील एज्युकेशन सोसायटीच्या न-हे कॅम्पसमध्ये पोहोचली. यामध्ये 500 विद्यार्थी व 100 शिक्षक सहभागी झाले होते. या रॅलीचा मुख्य उद्देश रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करणे तसेच पुणे शहराला प्रदूषण मुक्त करून स्मार्ट सिटी बनविणे हा होता. यावेळी प्रा. जयेश काटकर यांनी मार्गदर्शन केले. सुबराव लाड यांनी झीलच्या या स्तूत्य उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतूक केले तसेच त्यांनी रहदारीचे नियम पाळून सर्व नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.