प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीगणेश उत्सवानिमित्त गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष स्पर्धेचे आयोजन
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने श्रीगणेश चतुर्थीच्या निमित्ताने शुक्रवारी शाळेत इ. नर्सरी ते इ. १० वी.पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी गणपती स्तोत्र व अथर्वशीर्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या सुरुवातीस शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे व शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांनी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे पूजन केले. सर्व मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. इ. नर्सरी ते १० वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ५० मुली व ३० मुले अशा एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गणपती स्तोत्र व अथर्वशीर्ष या संस्कृत मंत्राचे उत्तम असे पठण करून त्यांनी आपल्या वक्तव्यातून सादरीकरण केले. अथर्वशीर्ष हे पार्वती पुत्राला समर्पित एक वैदिक प्रार्थना आहे. प्रतिदिन भगवान गणेशाचे अथर्वशीर्ष पाठ केल्याने घर आणि माणसाचे जीवन मंगलमय होते. सर्व बाधा दूर होतात. मंत्रोच्चारण केल्याने व्यक्तीचे कल्याण होते. श्रीगणेश स्तोत्र ही भगवान गणेशाची केलेली एक उत्तम प्रार्थना आहे. गणेशस्तोत्र हे नारद पुरणातून घेतले आहे. हे विविध समस्याचे निराकरण करते, याचे महत्त्व कुणाल पानपाटील यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन हेमांगी बोरसे यांनी केले. संयोजन कुणाल देवरे व स्मिता नेरकर आणि कांचन अहिरराव यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून कार्य शाळेचे उपप्राचार्य घनशाम सोनवणे, सहशिक्षक गणेश नांद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल पानपाटील यांनी केले. रांगोळी व इतर सजावट शाळेचे कलाशिक्षक किरण गवळी, दीपमाला अहिरराव व भूपेंद्र साळुंखे यांनी केली. मंगल मुर्ती मोरया…..गणपती बाप्पा मोरया…या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.