भक्तिभावात तल्लीन होवून प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या बाप्पाचे विसर्जन
साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळा मोठया भक्तिभावात पार पडला. गणेशोत्सवानिमित्त शाळेच्या प्रांगणात सत्यनारायण महापूजा करण्यात आली. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पत्नी कविता पाटील यांच्यासोबत सपत्नीक पूजा केली. त्यानंतर वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली.
तत्पूर्वी, शाळेतील विद्यार्थ्यांना श्रीगणेश भक्तीचे, उपासनेचे, आराधनेचे, पौराणिक कथेचे, भारतीय संस्कृतीतील सण उत्सवाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी शाळेत सदाशिव भजनी मंडळ, कावठे ता.साक्री जि.धुळे यांच्या वतीने शाळेव्दारे श्रीगणेश प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रवचनकार सायली रवींद्र नंदन शेणपूरकर यांनी भागवत श्री गणेश कथा सांगितली. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेश यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पध्दतीने पूर्ण होऊ शकत नाही. शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनविण्याची कल्पना त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सख्खींनी पार्वतीला सांगितले की, नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात. म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा. जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेने प्रभावीत होऊन देवी पार्वतीने आपल्या मळापासून गणपतीची निर्मिती केली, अशी कथा सांगून अनंत चतुर्दशीचे महत्त्व सांगितले. अनंत चतुर्दशी नावाप्रमाणेच हि चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते. उपवास केला जातो. त्यानंतर अनंत सुत्र किंवा अनंता हातात बांधले जाते. स्त्रिया डाव्या हाताला आणि पुरूष उजव्या हातात अनंत घालतात. हे अनंत सूत्र दीर्घ आयुष्य आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक मानले जाते. जे सनातन धर्मावर विश्वास ठेवतात. ते अनंत चतुर्दशीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करतात, असे सायली नंदन यांनी प्रवचनातून सांगितले. प्रवचनात सायली नंदन यांनी शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांचे आभार व्यक्त केले. अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करून त्यांच्या उत्तम प्रवचनाबददल अभिनंदन केले. शाळेतून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देत ईश्वर भक्तीचे व संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
गणपती विसर्जन प्रसंगी शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील व कविता पाटील यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया… अर्धा लाडू फुटला….गणपती बाप्पा उठला… अशा विद्यार्थ्यांच्या जयघोषाने श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सर्वांनी शाळेच्या प्रांगणामध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देऊन सुंदर असे नृत्य सर्व विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर शालेय श्रीगणेश मूर्ती विसर्जनाची रॅली साक्री तालुक्यातील कासारे गावामध्ये काढण्यात आली. या ठिकाणी इयत्ता ७ वी आणि ८ वी मधील विद्यार्थिनींनी उत्तम असे लेझीम नृत्य सादर केले. इयत्ता ३ री ब मधील कनिष्क खैरनार, इयत्ता ७ वी मधील अतुल ठाकरे, जिज्ञासा शिरसाठ यांनी श्री गणेश, माता पार्वती आणि शिवशंकर यांची उत्तम वेशभूषा साकारली. तसेच, कासारे गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर देवा श्री गणेशा…या गाण्यावर सुंदर श्री गणेश वंदना इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी मधील विद्यार्थिनींनी उत्तम आणि आकर्षक असे नृत्य सादर केले. वेशभूषा आणि लेझीम नृत्य, श्रीगणेश वंदना हे कासारे गावातील लोकांसाठी एक आकर्षण ठरले. सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक व सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आनंदात, जल्लोषात नृत्य सादर करून “गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या….. जयघोषाने मिरवणूकीची सांगता कासारे गावात करण्यात आली. पांझरा नदीच्या तीरावर श्री गणेश मूर्तीचे विसर्जन शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून बाप्पाचे विसर्जन नदी पात्रात करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन कुणाल देवरे, स्मिता नेरकर, कांचन अहिराव यांनी केले.
प्रवचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राजपूत यांनी केले. श्रीगणेश नृत्य व लेझीम नृत्य संयोजन रोहिणी अहिरराव व गीतांजली काकुस्ते यांनी केले. कार्यक्रमाची उत्तम सजावट किरण गवळी, दीपमाला अहिरराव, भूपेंद्र साळुंखे यांनी केली. शेवटी गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या… जयघोषाने गणपती विसर्जन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.