साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूल,साक्री येथे दिवाळी सण मोठ्या आनंदात आणि हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे व उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे सर व सह शिक्षक-शिक्षिका,विद्यार्थी यांच्यासह त्यांनी साक्री तालुक्यातील कावठे व साक्री शहरात स्वतः आदिवासी गरीब लोकांच्या वस्तीला भेट देऊन दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणानिमित्त कपडे व फराळ यांचे वाटप केले.
गोरगरिबांना दिवाळीच्या शुभेच्छा देत “स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला सुखी, समृद्धी लाभो सर्वांना या शुभेच्छा देत याही वर्षी गरीब वस्तीतील लोकांची दिवाळी गोड करण्याचे सामाजिक हिताचे कार्य केले. नेहमीच अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आपली सहकार्य वृत्ती दाखविणारे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील माणुसकीला एक नवा उजाळा देत असतात. त्यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने साक्री तालुक्यातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, न्यायालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग,आरोग्य केंद्र व इतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना भेट देऊन मिठाईचे वाटप केले. दिवाळीच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या यातून सामाजिक बांधिलकी व समाजावर असलेले प्रेम हे त्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून दिसून आले . त्यानंतर शालेय कार्यक्रमाचे आयोजन प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वप्रथमत: शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे,उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे यांच्या हस्ते लक्ष्मीमाता, धन्वंतरी देवता, कुबेर देवता यांच्या प्रतिमांचे व प्रत्यक्ष गौ-माता पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भगवान श्रीरामाची वेशभूषा -तनिष्क जितेंद्र गोसावी (इ.४थी.-अ) लक्ष्मणाची वेशभूषा -आरव श्रीधर देसले (इ.५वी-अ), ऋषिकेश हिरामण धनगर (इ.४थी-अ), सीता मातेची वेशभूषा- यशवंती त्रिलोक ठाकरे (इ.४थी-अ), मातालक्ष्मी वेशभूषा- तन्वी भूषण बदामे ( इ.६वी-अ), श्रीकृष्णाची वेशभूषा-शौर्य वैभव सोनवणे ( इ.४थी.-ब), सत्यधामाची वेशभूषा- परिणीती प्रमोद खैरनार (इ.५वी-अ) नरकासुराची वेशभूषा- विशाल अनिल गांगुर्डे ( इ.५वी -ब) कुबेराची वेशभूषा लोकेश विनोद साळुंखे (इ.२री-अ), वामनाची वेशभूषा-श्रेयस संदीप चिंचोले (इ.४ थी. ब ), भगवान विष्णूची वेशभूषा- आर्यन राजेंद्र भामरे ( इ.५वी.अ) इत्यादी वेगवेगळ्या उत्तम अशा वेशभूषा साकार केल्या. या वेशभूषेतील राम लक्ष्मण व सीता यांच्या अयोध्या प्रवेशाचा क्षण सर्वांसाठी आकर्षक ठरला.
दिवाळी सणानिमित्त ‘वसुबारस पूजा व मांडणी याची माहिती श्वेता सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिली. धनत्रयोदशीची पूजा व माहिती कांचन अहिरराव यांनी दिली. ‘नरक चतुर्दशी’ ची पूजा, मांडणी व माहिती हेमांगी गवांदे यांनी दिली. ‘लक्ष्मीपूजन’ व ‘बालप्रतिपदा’ विषयक माहिती अश्विनी ठाकरे यांनी दिली. दिवाळी, पाडवा, भाऊबीज सणानिमित्त हर्षदा गांगुर्डे यांनी माहिती दिली.
स्नेहा साळवे व कुणाल पानपाटील यांनी दिवाळी सणाचे संपूर्ण महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले की, “दीपावली” हा प्रकाशाचा चैतन्याचा उत्सव आहे. दिवाळी म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा आनंदाचा उत्साहाचा सण नवीन कपडे, छान छान वस्तू, लाडू-चिवडा, चकल्यांची यांची मस्त मेजवानी फटाक्यांची अतीश बाजी, दिव्यांची रोषणाई यांनी घर आनंदून जाते.
दिवाळी या नावातच उत्साह आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाण-घेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरस हे आपण दरवर्षी करतोच अलीकडेच्या धकाधकीच्या जीवनात बरेचदा या सणांचा आनंद आपण एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन घेत असतो आणि नवा उत्साह मनात साठवून परत येतो. पण दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहीत असतो.
शुभसूचक रांगोळी, वाईट प्रवृत्तींना दूर पाठवून देणारा आकाशदीप, अंधार दूर करून आयुष्यात प्रकाश पसरवून आपल्याला आनंद देत असलेल्या पणत्या ही दिवाळीची अगदी खास वैशिष्ट्ये. दिवाळी या मराठी नावाच्या जोडीने या सणाला संस्कृत नावेही आहेत. दिवाळीचा अर्थ आणि प्राचीनता दोन्ही आपल्याला सांगतात. दिपालीका, यक्षरात्री, सुखरात्री अशी तिची काही नावे आहेत.
दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. याच रात्री देवीची पूजा केली जाते, तिला ओटी दुधांचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवसाला “नवान्न पौर्णिमा” असेही म्हणतात. शेतातून नुकतीच हाती आलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ ‘रमा एकादशी’ येते. आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता. त्या काळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरले आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी सणाची योजना दिसते.
वासुबारसेचा आदला दिवस म्हणजे रमा एकादशी या दिवशी अंगणात दारातल्या तुळशीपुढे पहिली पणती लावली जाते. शहरात नसले तरी ग्रामीण भागात हे चित्र दिसते. शहरात बरेचदा वासुबारसेला दिवाळी सुरू होते.
शेतीसाठी बैल आणि दूध-दूभत्या गाय यांची खूप आवश्यकता असते. त्यामुळे “गोवत्स व्दादशी” सवत्स म्हणजे आपल्या वासरासह असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. कारण यांच्या पावलांनी शेता समृद्धी वाढते. त्या दिवशी गाय, बैल यांना विशेष मान असतो. गळ्यात माळा घालून त्यांची पूजा केली जाते. तीन सांजेला त्यांना ओवाळले जाते. पुरणपोळीचा घास भरविला जातो.
धनत्रयोदशी हा दिवस व्यापारी वर्गाचा आणि आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासकांचा. अमृताचा कुंभ घेऊन समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता प्रगटली तो हा दिवस असे मानले जाते. त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असे म्हटले जाते. आयुर्वेदाचे वैद्य या दिवशी धन्वंतरी पूजन करतात.
व्यापारी वर्गासाठी हा दिवस धनाच्या पूजेचा असतो. हिशोबाच्या नव्या चोपड्यांची, वहयांची पूजा या दिवशी केली जाते. धणे आणि गुळ यांचे नैवेद्य दाखवले जाते. मुले फटाके उडून आपल्या मराठी दिवाळी सणाचा आनंद साजरा करतात.
चांगल्या वृत्तीने आसुरी आणि वाईट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय म्हणजे “नरक चतुर्दशी”ची पहाट अशी आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला. त्याच्या आनंदानिमित्त आपण पहाटे उठून अभ्यंगस्नान करतो. या दिवसात हळूहळू थंडी पडायला लागलेली असते. आपली त्वचा ही कोरडी व्हायला लागलेली असते. अशावेळी उटणे दुधात कालवून त्यांच्या सुगंधित लेपाने अंग स्वच्छ करणे म्हणजेच त्वचेची काळजी घेणे आहे.
महाराष्ट्रात आपण अमावस्या अशुभ मानतो. दक्षिण भारतात मात्र ती शुभ मानले जाते. अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी आश्विन अमावस्येला आपण “लक्ष्मीपूजन” करतो. आपल्या घरात आलेली सचोटीने आणि प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती पूजनीयच आहे. ती वाढती राहो यासाठी धनाचा अधिपती कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करतो.
“बालप्रतिपदा” म्हणजे भगवान विष्णू ने वामन अवतारात बळीराजाचे सर्वसाम्राज्य मागून घेतले तो दिवस. यज्ञ करण्यात मग्न असलेल्या बळीराजाकडे वामन अवतारात भगवान विष्णू पोहोचले. त्यांनी त्यांच्या तीन पावलांत सामावेल एवढी भूमी बळीराजाकडे मागितली. दोन पावलातच सर्व विश्व व्यापल्यावर तिसरा पाय ठेवायला वामनाला जागा न मिळाल्याने त्याने बळीच्या मस्तकावरच आपला पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिले, अशी कथा प्रचलित आहे. ग्रामीण भागात शेतकरी शेतात बळीचे मातीचे राज्य तयार करतात. इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करतात. पाडव्याच्या या दिवशी विक्रम सावंत सुरू होते. व्यापारी वर्गाचे नवे आर्थिक वर्ष सुरू होते. पती-पत्नीच्या नात्याला गोडवा वाढणारा हा पाडवा सर्वात आनंद देतो.
उत्तर प्रदेशात पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत आहे. त्या दिवशी विविध प्रकारची मिठाई तयार करता आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करून श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवतात.
” यमद्वितीया” म्हणजे भाऊबीज ऋग्वेद या आपल्या प्राचीन ग्रंथात यम आणि यमी हे दोन भावंडे आहेत. भावाबहिणींचे नाते पवित्र आहे ,असे त्यांच्या संवादातून सुचित केले आहे. त्यामुळे भाऊ आणि बहिण यांच्या नात्यातील पावित्र्य,आस्था जपणारा हा दिवस आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या प्रत्येक राज्यात स्थानिक परंपरेनुसार दिवाळी साजरी होते. आनंद,उत्साह घेऊन येणारी दिवाळी संपते ती मात्र हुरहुर मनात घेऊनच मुलांनी केलेले दिवाळीचे किल्ले आणि आपली वाचनाची आवड जपणारे दिवाळी अंक, दिवाळीनंतर हि तुळशी विवाहपर्यंत आपल्या दारात झुलणारा आकाशकंदील दिवाळीच्या आठवणी आपल्या मनात साठवत राहत असतो, असे अनमोल मार्गदर्शन दिवाळी सणानिमित्त स्नेहा साळवे व कुणाल पानपाटील यांनी केले. त्यानंतर या दिवाळी सणा निमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून गड-किल्ले बनवणे, आकाश कंदील बनवणे, तोरण बनवणे व इतर सजावटीच्या वस्तू बनवणे असे इयत्ता नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर व कौशल्यावर आधारित उपक्रम राबविण्यात आले. यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या हस्ते सर्व शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक यांना मिठाई वाटप करण्यात आली. संध्याकाळी शुभ दीपावलीचे दिवे प्रज्वलित करून दिवाळी सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अशा मोठ्या आनंदात उत्साहात हा कार्यक्रम शाळेमध्ये पार पडला. या कार्यक्रमात फोटो व व्हिडीओ शुटींग नम्रता गोसावी व अंजली लाडे यांनी केली. कार्यक्रमाचे संयोजन हिरल सोनवणे, तेजस्वीनी घरटे,वैष्णवी देवरे,रवींद्र सोनवणे, प्रभावती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पाडण्यासाठी मोठे योगदान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. सुंदर सजावट करण्याचे कार्य कलाशिक्षक किरण गवळी, भूपेंद्र साळूंके, दिपमाला आहिरराव यांनी केले. रांगोळी सजावट सविता लाडे,सपना ठाकरे, दिपमाला आहिरराव यांनी केली. तसेच इयत्ता नर्सरी ते यु.के.जी विद्यार्थ्यांकडून दिवे बनविण्याचे संयोजन -सुनीता पाटील व इ.१ली ते इ.५वी. विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील बनवण्याचे संयोजन -मनिषा बोरसे, इ.६वी.ते इ.१० वी. विद्यार्थ्यांकडून तोरण बनविण्याचे संयोजन -सविता ठाकरे यांनी केले. इ.३ री. ते ५ वी मधील विद्यार्थ्यांचे “हॅपी दिवाली नृत्य” संयोजन रोहिणी अहिरराव यांनी केले. सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम आनंदात उत्साहात आणि दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत समारोप करण्यात आला.