प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे दीपावली सण साजरा
पिंपळनेर : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊन येवो नवी उमेद, नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छांनी प्रचिती पब्लिक स्कूल येथे दीपावली सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होते.
प्रचिती पब्लिक स्कूलच्यावतीने दरवर्षी एक आगळावेगळा उपक्रम साजरा केला जातो. यामध्ये, गोरगरिबांना फराळ व कपडे वाटप करून त्यांची ‘दीपावली’ गोड करून त्यांना शुभेच्छा देण्यात येतात. आजच्या या धावपळीच्या युगात फक्त स्वतःपुरता विचार करणारे लोक आहेत. परंतु अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे नेहमीच आपली सहकार्यशील वृत्ती दाखविणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील नेहमीच माणुसकीला एक नवा उजाडा देत असतात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी देखील कपडे व फराळ गोळा करून आपला सहभाग नोंदवितात. या कार्यक्रमासाठी श्रीरामांची भूमिका सुयश कोळी, लक्ष्मणांची भूमिका आर्यन अहिरराव आणि सीतामातेची भूमिका दीक्षिता पवार व लक्ष्मी देवीची भूमिका आरुषी बताव यांनी साकारली.
शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दीपावली हा सण पाच दिवसांचा साजरा केला जातो. त्यासाठी वसुबारसची पूजा मांडणी व माहिती सुनीता जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिली. धनत्रयोदशीची पूजा व माहिती अश्विनी पगार यांनी दिली. नरक चतुर्दशीची पूजा मांडणी व माहिती सरिता अहिरे, लक्ष्मीपूजनाची माहिती अर्चना देसले, बलिप्रतिपदाची माहिती योजना जाधव यांनी दिली. भाऊबीजेची माहिती व पूजा मांडणी जागृती जाधव यांनी केली.
दरम्यान, शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्याहस्ते वसुबारस, धनदेवता लक्ष्मीदेवी व नरक चतुर्दशीची पूजा करण्यात आली. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिठाई वाटून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी नर्सरी एलकेजी व युकेजी च्या विद्यार्थ्यांनी दिवे तयार करून आणले. तर, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवले. पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तोरण बनवली. या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन रिनल सोनवणे, योजना जाधव यांनी तर सुंदर असे फलक लेखन अश्विनी पगार व जागृती बिरारीस यांनी केले. रांगोळी सुनीता जाधव, मयुरी सोनार व किरण देवरे यांनी काढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता अहिरे यांनी केले.