प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये उमेदवार मंजुळाताई गावित यांच्याकडून प्रचार; बालदिनानिमित्त मुलांना चॉकलेट वाटप
साक्री :- विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून सर्वचस्तरावर नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गुरुवारी बालदिनानिमित्त उमेदवारांनी प्रचारादरम्यान लहान मुलांसोबत आनंद व्यक्त केला. साक्रीच्या भाजप-शिवसेनेच्या उमेदवार मंजुळाताई गावित यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये लहान मुलांना चॉकलेट वाटप केले.
चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता पाहून धावपळीत उमेदवारांना त्यांचे लाड करण्याचा मोह आवरता आला नाही. उमेदवार गावित यांच्या कार्यकर्त्यांनी मुलांशी संवाद साधला. तुमच्या घरातील सदस्यांना मतदान करायला सांगा, असे आवाहन
त्यांनी केले. त्यावेळी मुलांनी उमेदवारांना प्रश्न विचारले. आमच्याही समस्या सोडवाल का, असा प्रश्न केला.
साक्री येथे आणखी सुविधा आवश्यक आहेत. त्या कधी उपलब्ध होणार, असे मुलांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते भारावले. उमेदवारांनी प्रचारादरम्यान, पदयात्रेदरम्यान मुलांशी संवाद साधला. तसेच सेल्फी व फोटो घेतले.
त्यामुळे सर्वसामान्यांसह उमेदवारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील भारावले. भावी आमदारांनी मुलांचे लाड पुरवल्याने त्यांचे पालक देखील आनंदीत झाल्याचे दिसून आले.