

साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे गोकुळाष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे चेअरमन श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “गोकुळाष्टमी हा सण भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला आनंद, एकता व नैतिकतेचा संदेश देते. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास तर होतोच, पण त्यांच्यात परंपरा आणि मूल्यांची जपणूकही होते.” तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि आयोजन समितीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन इन्चार्ज सौ. वैष्णवी देवरे व सौ. दिपमाला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी नीलिमा पाटील व श्रेया कुवर यांनी आकर्षक सूत्रसंचालन केले. चौथीच्या विद्यार्थ्यांनी मनोहरी नृत्य सादर केले तर सहावीच्या विद्यार्थ्यांनी गवळण सादर करून वातावरण आनंदमय केले. निहारिका बोरसे हिने श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. श्रीकृष्णाचा पाळणा फुलांनी सजविलेला असल्याने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.





प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णांची सुंदर वेशभूषा केली होती. त्यांची दहीहंडी आणि सादरीकरण विशेष कौतुकास्पद ठरले. आजच्या युगात मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत हे दाखवण्यासाठी मुलींनीदेखील दहीहंडी फोडून बाजी मारली. यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला गेला. मुलांसाठी उंच दहीहंडी ठेवण्यात आली होती. ती फोडत असताना संपूर्ण शाळेने जोरदार जल्लोष केला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये याची विशेष काळजी घेतली. यानंतर विद्यार्थ्यांनी “गोविंदा आला रे आला”, “बरसाने की छोरी राधा गोरी गोरी” अशा गोकुळाष्टमीवर आधारित गाण्यांवर नृत्य करून उपस्थितांचे मन मोहून टाकले.
संपूर्ण कार्यक्रम प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. वैभव सोनवणे व श्री. तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांचा उत्साह आणि सादरीकरणातील कलात्मकता पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले व भरभरून कौतुक केले. गोकुळाष्टमी सोहळ्यामुळे संपूर्ण प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ‘कृष्णमय’ झाले होते.


















