तिळगुळाच्या गोडीत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये मकर संक्रांत सण साजरा



सूर्य उत्तरायणाला येतो,
नवचैतन्य घेऊन येतो,
तिळगुळाच्या गोडीने
नात्यांत प्रेम पेरतो…
साक्री : मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त शाळेत पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात मकर संक्रांत साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जपणूक व सणांचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक आदरणीय श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी मार्गदर्शन करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. “संक्रांत म्हणजे नवे विचार, सकारात्मक ऊर्जा आणि एकोप्याचा संदेश देणारा सण आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
सदर कार्यक्रम प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,“मकर संक्रांत हा सण आपल्याला नातेसंबंधात गोडवा ठेवण्याचा व सकारात्मक विचार करण्याचा संदेश देतो. विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जपून शिक्षणासोबतच सणांचे महत्त्व समजून घ्यावे.”कार्यक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सौ. वैशाली खैरनार व सौ. तेजस्विनी घरटे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. राहुल पाटील यांनी प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांनी पतंग तयार करणे, पतंग उडवणे अशा विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पतंग तयार करणे व सजावट कार्याची जबाबदारी श्रीमती दिपमाला अहिरराव व सौ पुजा जोहरी यांनी समर्थपणे पार पाडली. संक्रांतीचे महत्त्व स्पष्ट करणारे भाषण श्री वैभव जोशी यांनी केले. तिळगुळ वाटप करून “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून आपुलकी व सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटपाचे काम श्रीमती नम्रता गोसावी व सौ. ज्योती नांद्रे यांच्या देखरेखीखाली पार पडले. विद्यार्थ्यांना आपली परंपरा, संस्कृती आणि सणांचे सामाजिक महत्त्व समजावे, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,नववर्षी सुख-समृद्धी फुलू द्या!
सर्वांना मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा!















