बारणे बंधूंचा मोठा विजय
नीलेश बारणे यांची हॅटट्रिक, विश्वजीत बारणे यांची पहिली इंनिग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग २४ थेरगाव-दत्तनगरमधून शिवसेनेकडून निवडून येत बारणे बंधूंनी मोठा विजय मिळवला. नीलेश बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रिक केली. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचा पराभव करत महापालिका सभागृहात प्रवेश केला. त्यांची ही पहिली इंनिग आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग २४ थेरगाव-दत्तनगर हा बारणे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. या प्रभागाचे हिरामण बारणे यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पाचवेळा या प्रभागातून विजय मिळविला होता. श्रीरंग बारणे यांनीही स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, शिवसेना गटनेते अशी महापालिकेतील पदे भूषविली. खासदार बारणे यांचे पुतणे नीलेश हे तिसऱ्यांदा या प्रभागातून निवडून आले आहेत. त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार गणेश गुजर यांचा पराभव केला. नीलेश यांची यंदाची तिसरी टर्म असून तिन्हीवेळा ते शिवसेनेकडून निवडून आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात युवा संघटन बळकट केल्यानंतर विश्वजीत बारणे यांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी हाती घेतली. पश्चिम महाराष्ट्रात संघटना बांधणी मजबूत केली आहे. संघटनेतील कामकाजाच्या अनुभवानंतर विश्वजीत यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. प्रभाग २४ मधून त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या माजी उपमहापौर झामाबाई बारणे यांचे पुत्र माजी नगरसेवक राहिलेल्या भाजपच्या सिद्धेश्वर बारणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. विश्वजीत यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या पहिल्या इंनिगला सुरुवात केली. त्यांच्या रूपाने अभ्यासू, तरुण, शहरातील युवा पिढीच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व महापालिका सभागृहात आले आहे. तरुणांचा आवाज होणार असल्याचे विश्वजीत यांनी विजयानंतर सांगितले. हा विजय आपला नसून प्रभागातील सर्व नागरिकांचा असल्याचेही ते म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, प्रभाग २४ थेरगाव-दत्तनगरममध्ये शिवसेनेचे नीलेश बारणे आणि विश्वजीत बारणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नीलेश अनुभवी नगरसेवक आहे. विश्वजीत तरुण असून प्रभागाच्या विकासाचे ‘व्हिजन’ त्याच्याकडे आहे. दोघेही प्रभागाचा सर्वांगीण विकास करतील असा मला ठाम विश्वास आहे.















