प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे
मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शाळेचा स्तुत्य उपक्रम


साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री येथे मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शाळेचा स्तुत्य उपक्रम किशोरवयीन व वयात येणाऱ्या मुलींमध्ये आढळणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शाळेत विशेष प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीसीओडी म्हणजे काय, त्याची कारणे व लक्षणे, तसेच चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे, केस गळण्याची समस्या आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सौ. विजया अहिरराव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पीसीओडीसारख्या आजाराविषयी गैरसमज दूर करताना योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्व मुलींना समजावून सांगितले. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स व केस गळण्यास कारणीभूत ठरणारे हार्मोनल बदल, अस्वस्थ जीवनशैली व अपुरी काळजी याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.सदर कार्यक्रम शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सपना ठाकरे यांनी प्रभावीपणे केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन सौ. वैशाली खैरनार यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थिनींसोबत शाळेच्या शिक्षिकाही उपस्थित होत्या.
या मार्गदर्शनामुळे मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. उपस्थित मान्यवरांनी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.















