प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये मॅजिक ऑफ सायन्स विज्ञान शिबिर
व अभ्यास कौशल्य मार्गदर्शन शिबिर उत्साहात साजरे
साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध विज्ञान तज्ज्ञ (Great Scientist) श्री. दिनेश श्रीमंत काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मॅजिक ऑफ सायन्स’ या विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ऑक्सिजन गॅस तयार करणे, हायड्रोजन व एस–टू (S2) गॅस केमिकल रिएक्शनद्वारे तयार करणे तसेच हवेमध्ये लोखंड पेटवण्यासारखे रंजक व थरारक प्रयोग सादर करण्यात आले.
तसेच याच उपक्रमांतर्गत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यास मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. या सत्रामध्ये माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जोडून विविध व्याख्या कशा समजून घ्याव्यात, मोठी उत्तरे मुद्देसूद व सोप्या पद्धतीने कशी लक्षात ठेवावीत, की-वर्ड्स, संक्षिप्त सूत्रे, आकृती व तक्त्यांचा योग्य वापर करून उत्तरलेखन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास आदरणीय चेअरमन श्री प्रशांत भीमराव पाटील यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम नेहमीच ते राबवत असतात. विद्यार्थ्यांनी विज्ञान व अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयोगातून व सोप्या पद्धतीने शिकावे, असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच समन्वयक श्री. तुषार देवरे व श्री. वैभव सोनवणे यांनी नियोजन व अंमलबजावणीत मोलाचे सहकार्य केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
परीक्षा संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानवर्धक व कौशल्यविकासात्मक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचीही चांगली उपस्थिती लाभली. विज्ञानाची गोडी निर्माण करणारा व अभ्यास सुलभ करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.















