पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या वतीने प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. मात्र राष्ट्रवादीकडून अखेरच्या क्षणी प्रशांत शितोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. चिंचवडमधून महायुतीच्यावतीने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. शितोळे यांनी शुक्रवारी चिंचवड मतदारसंघात समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते नाना काटे, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.