पिंपरी :- राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भोसरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नसल्याने मोठ्या नाचक्कीला सामोरे जावे लागले आहे.
विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आज दि.४ (शुक्रवारी) दुपारी ३ वाजेपर्यंत होती. दरम्यान महायुतीकडून महेश लांडगे यांनी आज मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. परंतू दुसरा मोठा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तर राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार असलेले माजी आमदार विलास लांडे आणि दत्ता साने यांनी पक्षाचे तिकीट नाकारत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी देखील अपक्ष अर्ज भरत सर्वांनाच धक्का दिला आहे.
एकेकाळच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी मतदार संघात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा उमेदवार नसणार आहे. भोसरी हा राज्यात एकमेव मतदारसंघ असणार आहे की, त्यात आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहे.