पिंपरी :- पिंपरी विधानसभेतकडून माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुलक्षणा शिलवंत-धर यांनी देखील राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठी नेमकी उमेदवारी कोणाची अधिकृत घोषित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली होती. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना जाहीर झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले माजी आमदार आण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ नाराज झाले होते. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन बंडाचा इशारा दिला होता. अपक्ष लढणार असल्याचे बनसोडे यांनी जाहीर केले. माजी आमदार बंडखोरी करणार असल्याने पक्षातील घडामोडींना वेग आला. मोठी खलबते झाली. त्यामुळे रात्रीत उमेदवार बदलण्याचा निर्णय घेत बनसोडे यांना उमेदवारी देत एबी फॉर्म दिला.
दरम्यान, आण्णा बनसोडे यांनी आज सकाळीच राष्ट्रवादीच्या एबी फॉर्म आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुलक्षणा शिलवंत-धर यांनी देखील राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.