अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नगरसेवक नामदेव ढाके यांचे नागरिकांना आवाहन; खान्देशातील विविध सामाजिक संघटना जगतापांच्या विजयासाठी एकवटल्या

पिंपरी चिंचवड चिंचवड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमल फुलविण्यासाठी खान्देशातील विविध संघटनांनी मुठ बांधली आहे. पिंपरी चिंचवड शहरात सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाल्हेकरवाडी येथे वास्तवास असलेल्या खान्देशी जनतेने महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठींबा दर्शविला आहे. तसेच, चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांना लाखोंच्या मताधिक्यांने विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके आणि सांगवीतील भाजपाच्या नगरसेविका शारदा सोनवणे यांनी नुकतीच खान्देशातील विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यामध्ये, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या आदेशाने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याच्या सूचना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत देण्यात आल्या. यावेळी, खान्देश माळी महासंघ, जळगाव जिल्हा लेवा समाज, जळगाव जिल्हा गुजर समाज मित्र मंडळ, खान्देश युवा प्रतिष्ठान, अखिल भारतीय खान्देश युवा प्रतिष्ठान, सरदार वल्लभभाई पटेल युवा मंच, खान्देश कोळी महासंघ तसेच विविध संघटनांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दर्शविला.

बैठकीतील पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना भाजपाचे नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले की, सध्या विरोधी पक्ष हे एकनाथराव खडसे यांच्या नाराजीचे भांडवल करीत आहे. परंतु, गेली चाळीस वर्ष एकनाथराव खडसे हे एकनिष्ठपणाने भाजपाचे काम करीत आहे. राज्यात खडसे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यावर अन्याय झाल्याचे निवडणुकीत भांडवल केले जात आहे. मात्र, एकनाथराव खडसे यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत भाजपा सोडणार नसल्याने स्पष्ट केले आहे. तरी देखील विरोधकांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून खान्देशी लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे खान्देशी जनतेने विरोधकांच्या भुलधापांकडे दुर्लक्ष करून महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन खुद्द एकनाथराव खडसे यांनी केल्याचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सांगितले.

सांगवीतील नगरसेविका शारदा सोनवणे म्हणाल्या की, सांगवीत जळगाव, धुळे, नंदुरबार येथून आलेला खान्देशी बांधव एकदिलाने राहत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचा नेहमीच खान्देशी नागरिकांच्या प्रत्येक चांगल्या कार्यात सहभाग राहिला आहे. खान्देशी नागरिकांच्या कुठल्याही अडचणीच्या वेळी आमदार धावून येत असतात. खान्देशी नागरिकांना न्याय देण्याचे काम आमदार लक्ष्मण जगतापांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणणे आपले कर्तव्य आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरणार्‍या अफवांवर नागरिकांनी विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन करीत येत्या 24 तारखेला आपणच गुलाल उधळणार असा विश्‍वास सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

खान्देश युवा प्रतिष्ठानचे शंकर पाटील म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि गिरीष महाजन हे खान्देशाची शान आहे. त्यांच्यात कुठलाही मतभेद नसून ते एकदिलाने भाजपाचे काम करीत आहेत. भाजपाकडून एकनाथराव खडसे यांच्यावर अन्याय करण्यात आला, असा गवगवा विरोधकांकडून करण्यात येत आहे. हे विरोधकांचे षडयंत्र आपण येत्या 21 तारखेला आमदार लक्ष्मण जगताप यांना मतदान करून तोडावे, असे मत शंकर पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी, स्विकृत नगरसदस्य देविदास पाटील, माजी नगरसेविका ललिता पाटील, भाजपाचे धर्मा पवार, सुरेश पाटील, कैलास सानम, छाया पाटील, अशोक बोडखे, यांच्यासह सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाल्हेकरवाडी येथील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here