पुणे : अजित पवार यांनी भाजपबरोबर जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही पवार कुटुंब आणि पक्षात उभी फूट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारे व्यक्त केली आहे.
तीन पक्षांची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले. यापूर्वीही महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. तर ही पवार कुटुंब आणि पक्षात फूट असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.