नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळीचे प्रकार होत असल्याची ग्राहकांच्या अनेकदा तक्रारी असतात. गेल्या पाच वर्षात तेलइंधनातील भेसळीच्या सुमारे ५ हजार ६०५ तक्रारी या सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेमध्ये दिली.
तृणमुल काँग्रेस पक्षाचे खासदार प्रतिमा मोंडाल यांनी तेलइंधनातील भेसळीबाबत संसदेत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, भेसळीच्या काही प्रकरणात ७२ डीलरचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. हे परवाने विपणन शिस्तीच्या मार्गदर्शक सूचनांचा (एमडीजी) भंग केल्याप्रकरणी रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत मोटर स्पिरीट अँड हाय स्पिरीट डिझेलबाबत अधिसूचना काढली होती. यामुळे पेट्रोलियम उत्पादनातील भेसळीविरोधात सरकारला कठोर कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनाच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्याकरिता विशेष सेल चालू केल्याचेही धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत सांगितले. या सेलकडून तेलइंधनाचे परीक्षण तसेच पेट्रोल पंपामधून इंधनाचे नमुने गोळा करण्यात येतात. त्यानंतर हे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासण्या करण्यासाठी पाठविले जातात. तसेच तेलइंधन घेवून जाणाऱ्या वाहनांवर जीपीएस बसविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.