पुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात होणार की, पुरंदर तालुक्यात होणार याबाबत चर्चा सुरू होती. पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे केली.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची 56 वी सर्वसाधारण बैठक वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर जमीन संपादित केली जाणार असून, विमानतळाच्या जागेसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सहा ठिकाणी पाहणी केली आहे व पुरंदर येथील जागेला पसंती दर्शविली असल्याचे ते म्हणाले. पुरंदर हे छत्रपती संभाजीराजे यांचे जन्मस्थान आहे. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असेही मुच्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पुरंदर विमानतळाला तेथील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात अनुकूलता दाखविली असून, यामुळे जमीन संपादनाला वेळ लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जमीन संपादनानंतर तीन वर्षांत विमानतळाचे काम पूर्ण करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी सांगितले.