Chaupher News
मुंबई : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्याचा शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी निषेध केला असून ते स्वतः शनिवारी बेळगावला जाणार आहेत. मी बेळगावला जात आहे. पाहू काय घडते. मी खासदार आहे, या देशाचा नागरिक आहे. मला रोखायचे असेल तर कायद्याने रोखा, असा सज्जड इशारा राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. तसेच महाराष्ट्र भाजप कर्नाटकच्या दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय, असा सवाल विचारला आहे.
संजय राऊत यांनी टि्वट करत बेळगावला जाणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय?, असा सवालही केला.