Chaupher News
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत पुणे मेट्रोचे नाव बदलून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीत मेट्रोसंदर्भातले अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले .
मेट्रोचे प्रस्तावित 6 कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरू करण्याऐवजी सगळ्या कॉरिडॉरचं काम एकाचवेळी सुरू करण्यासाठी डीपीआर करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्याचबरोबर पुणे मेट्रोचं नाव बदलून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असं करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात. पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज असा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय. वनाज रामवाडी मार्ग वाढवून तो चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रो चा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवण्यात येणार आहे.
हडपसर स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित आहे. तर निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. खडकवासला ते स्वारगेट हा ही मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. वारजे ते शिवाजीनगर ह्या मार्गाचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.