Chaupher News
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अमित शाह यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ही निवड लांबणीवर पडली होती.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अमित शाह यांचे उत्तराधिकारी म्हणून जे. पी. नड्डा यांच नाव आघाडीवर होतं. पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हाच जे.पी. नड्डा यांची निवड करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नड्डा यांचा एकमेव अर्ज आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पार पडल्यानंतर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात जे.पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ 2022पर्यंत असणार आहे. राधामोहन सिंह यांनी नड्डा यांच्या नाव जाहीर केल्यानंतर मावळते भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केलं.






















