पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे नवरात्र उत्सव काळात दांडिया व गरबा स्पर्धांच्या आयोजकांकडून लावलेल्या एक हजार अनधिकृत फलकांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाई केल्याची माहिती प्रसासानाने दिली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने एक हजार आठ अनधिकृत फलकांवर कारवाई करत अठरा हजार रूपयांचाही दंड वसूल केला आहे. नवरात्र उत्सवातील अनधिकृत फलकबाजी रोखण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला विशेष मोहीम राबवून कडक कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईत सर्वाधिक अ प्रभागात 337, फ 255, क 195, ड 137, इ 71 तर ब प्रभागात फक्त 13 अशा एक हजार 8 अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली.
या संदर्भात महापालिकेचे सहायक आयुक्त योगेश कडूसकर म्हणाले की, नवरात्र उत्सवात लावल्या जाणार्या अनधिकृत फलकबाबत उच्च न्यायालयाचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले होते. त्यानुसार सहाही प्रभागअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे यंदा नवरात्र उत्सव धुमधड्यात साजरा करण्यात आला. अनेक इच्छूकांनी ठिकठिकाणी दांडिया, गरबा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याच्या प्रसिध्दीसाठी अनधिकृत फलक लावण्याचा मार्ग मंडळांकडून अवलंबविला होता. त्यावर कारवाई करत महापालिकेने 1 हजार आठ अनधिकृत फलकांवर कारवाई केली आहे.