पिंपरी : पिंपळे गुरव येथील कोकणे चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रासप विरुद्ध केलेल्या आंदोलनात घोषणाबाजी केल्याच्या कारणावरून वाकड पोलिसांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्यासह 60 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याविषयी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी एमपीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यमंत्री महादेव जानकर हे कोकणे चौकात कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दुपारी दोनच्या सुमारास घोषणाबाजी करत रस्त्यांवर आंदोलन सुरू होते. त्यावेळी वाकड पोलिसांनी कारावाई करत राष्ट्रवादीच्या 60 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये आझम पानसरे, संजोग वाघेरे, नाना काटे, सुजाता पालांडे, नीता परदेशी, चेतन पवार, मयूर कलाटे आदींचा समावेश आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शांततेचा भंग होऊ नये. यासाठी सांगवी पोलिसांनी नाना काटे यांना सकाळी नोटीस देण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांनी जानकर यांच्या शिबिराच्या कार्यक्रमामध्ये काटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले होते. त्यामुळे नोटीस नंतरही हे आंदोलन करण्यात आले त्यामुळे वाकड पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याच बरोबर सकाळी काळभोरनगर येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यामुळे शहरात ताणावाचे वातावरण होते.