Chaupher News
नाशिक : हिंगणघाट येथील घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर एका विवाहितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा पयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आज, शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांनी विवाहित महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असेल. बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर एक विवाहित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. त्यावेळी अचानक चार अज्ञात तरूणांनी अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ बसस्थानकावर धाव घेत सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे तपासाला गती दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.