मुंबई: सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा, अशा सूचनाच काँग्रेस हायकमांडने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना कोणत्याही क्षणी निलंबित करण्यात येणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कालच सत्यजित तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे तांबे पितापुत्रांना मोठा झटका बसला आहे.
कोणत्याही क्षणी सत्यजित तांबे यांची पक्षातून निलंबित करण्याची शक्यता
काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दिला होता. पण सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याविषयी आधीच सूचक विधान केलं होतं. त्यानंतर या राजकीय घडामोडी घडल्याने एकच खळबळ उडाली होती. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने त्याची काँग्रेसने गंभीरपणे दखल घेतली असून सुधीर तांबे यांना कालच पक्षातून निलंबित केलं आहे. तर, सत्यजित तांबे यांनाही पक्षातून निलंबित करा, असे आदेशच दिल्लीतून हायकमांडने राज्य काँग्रेसला दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्य काँग्रेस कोणत्याही क्षणी सत्यजित तांबे यांची पक्षातून निलंबित करण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी उमदेवारी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. परिणामी, काँग्रेसचे मोठे हसे झाले. यासंदर्भात पटोले म्हणाले, सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षासोबत फसवेगिरी केली आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. याशिवाय काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिलेला असतांना त्यांनी अर्ज दाखल न करणे हा पक्षासोबत धोका आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली नव्हती, असे त्यांनी नमूद केले.