पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यात भयावह अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अजित पवार यांनी स्वत:च एका कार्यक्रमात या भीषण घटनेबाबतची माहिती दिली आहे. ही घटना (१४ जानेवारी) रोजी घडली होती.
‘मी काल कुठे बोललो नव्हतो, पण तुम्ही घरचे आहात म्हणून बोलतो. काल मी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. दादा तिसऱ्या मजल्यावर आलात आता चौथ्या मजल्यावर लिफ्टने जाऊ असं ते म्हणाले. मी नको म्हणालो. तरी आम्ही लिफ्टमध्ये बसलो, लिफ्ट वर जाईना, तिथच बंद झाली, मग लाईट गेले. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट दाणकन खाली आली. आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता,’ असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या विधानानंतर एकच हश्या पिकला.
‘यानंतर दरवाजा तोडण्यात आला, पण मला भीती हर्डीकर डॉक्टरांची होती. याबाबत मी पत्नी आणि आईलाही बोललो नाही. मी पत्रकारांनाही सांगितलं नाही, नाहीतर कालच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. याबाबत कुणालाही बोलून नका, हे मी यांना सांगितलं होतं,’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
‘आपण आपली काळजी घेतली पाहिजे. परमेश्वराची कृपा, आपल्या सगळ्यांचे आशिर्वाद. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडदिशी आदळली. स्ट्रेचर नेणारी मोठी लिफ्ट होती. हर्डीकर डॉक्टरांना थोडं लागलं,’ असं अजित पवार म्हणाले.