Chaupher News
साक्री : हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाने ही महाराष्ट्राची पावनभूमी पवित्र झाली आहे. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबल इच्छाशक्ती, मुत्सुध्दी, रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा अशा विविध गुणांनी परिपूर्ण छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, असे प्रतिपादन शिक्षिका रोहिणी अहिरराव यांनी केले. त्या प्रचिती प्री. प्रायमरी व इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात शिवजन्माने करण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराज प्रतिमा व सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक वैभव सोनवणे, व तुषार देवरे यांचीं प्रमुख उपस्थिती होती.

लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी असल्याचे शाळेचे शिक्षक मंगेश बेडसे यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासावर भाषणे केली. कोणी शिवाजी महाराज तर कोणी महाराजांच्या मावळ्याची वेशभूषा साकारल्यामुळे शाळेतील वातावरण शिवमय झाले होते. यानंतर शाळेच्या आवारात भगवे झेेंडे घेउन रॅली काढण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून आकर्षक फलक लेखनही करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्मिता नेरकर यांनी केले.