पिंपरी (18 ऑक्टोबर 16) : शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या दृष्टीने अतिक्रमित जमिनीचा योजना आराखडा तयार करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल असे लेखी आश्वासन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी दिल्यानंतर विविध मागण्यांसाठी अपना वतन संघटनेने सुरु केलेले आपले बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी (17 ऑक्टोबर16) मागे घेतले.
युवा उद्योजक संदीप वाघेरे व स्वराज इंडिया पार्टीचे मारुती भापकर यांनी अपना वतनच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. अतिरिक्त आयुक्तांनी लेखी पत्र देऊन 15 दिवसांत समिती गठीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी श्रावणबाळ माता पिता संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, अपना वतनचे अध्यक्ष सिद्धीक शेख, हमीद शेख, दिलीप गायकवाड, आकाश कांबळे, अब्दुल शेख, हाजी मलंग शेख, जितेंद्र जुनेजा, मनोज मोरे, नरेंद्र पवार, चंद्रवदन जगदाळे, हेमलता पवार, निर्मला डांगे, पूजा सराफ, बशीर मुलानी आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर ‘अपना वतन’ चे आंदोलन स्थगित
