पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार मतदार नोंदणीची मुदत आठ दिवसांनी वाढवत 21 ऑक्टोबरपर्यंत केली आहे.
त्यानुसार आता 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्यांना आता 21 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. मतदार नोंदणीसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत विशेष मतदार नोंदणी मोहीम 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत राबविण्यात आली होती. मात्र नावनोंदणीसाठी नागरिकांचा ओघ बघता राज्य निवडणूक आयोगाने ती मुदत वाढवली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी या मतदार यादीचा अवलंब करण्यात येणार आहे. यापूर्वी दि. 14 ऑक्टोबरपर्यंत असलेल्या मुदतीत सुमारे 70 हजार 960 अर्ज प्राप्त झाले आहेत, असेही आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
कार्यालयीन कामकाजाच्या वेळी नागरिकांना चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी थेरगाव येथील मनपा शाळा, पाण्याच्या टाकीजवळ तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी आकुर्डी स्टेशनजवळील डॉ. हेगडेवार भवनात तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी नेहरूनगर, पिंपरी येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे पहिला मजल्यावर तर भोर-वेल्हा- मुळशी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी भोर येथील प्रांत कार्यालयात मतदार नोंदणीसाठी संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
तसेच महापालिकेच्या 6 प्रभाग कार्यालयांसह शहरातील 14 महाविद्यालयात देखील मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये सांगवी येथील बाबुराव घोलप विद्यालय, पिंपरी येथील मानधनमल उधराम कॉलेज, चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्यूटर स्टडिज, पिंपरी येथील डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठान इ. अॅण्ड टीसी, निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी, निगडी प्राधिकरण येथील डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठाण कला, वाणिज्य आणि विज्ञान, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, चिंचवड स्टेशन येथील एटीएसएस कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अॅण्ड कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज, भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, चिंचवड येथील रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिटयूट, ताथवडे येथील राजश्री शाहू कॉलेज, रावेत रोड ताथवडे येथील बालाजी लॉ कॉलेज, वाकड येथील इंदिरा कॉलेज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी या मुदत वाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.