पिंपरी (दि.18 ऑक्टोबर 2016) नदीत जेव्हा ओहोळ मिळतात तेव्हा त्यांचे अस्तित्व राहत नाही. नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा नदीचे अस्तित्व राहत नाही. त्याप्रमाणे नामस्मरणात तल्लीन होऊन संतांच्या माध्यमातून परमात्याची प्राप्ती होऊ शकते. असे मार्गदर्शन ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांनी केले.
भोसरी येथे श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि.17) ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांच्या ‘तुका झालासे कळस’ हे प्रवचन आळंदी रोडवरील सखुबाई गवळी उद्यानात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, पै. पोपट फुगे, प्रा. एस.आर.शिंदे, प्रा. शिवलिंग ढवळेश्वर, प्रविण लोंढे, दिगंबर ढोकले, प्रा. शरद जगताप, करुणा बहेनजी, थोरवे मामा, गणेश लोंढे आदी उपस्थित होते.
ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी निरुपण करताना सांगितले की, वसुधैव कुंटुंबकम् म्हणजे हे विश्वच एक कुंटुंब आहे ही भावना धर्माने निर्माण केली. मुख्य धर्म देव चित्ती । आदी आवसान अंती ।। नितीचे आचरण करुन आपले कर्तव्य करावे हे धर्म सांगतो. पाप ताप दैन्य जाय उठा उठी । झालिया भेटी हरिदासांची ।। हरि नामाचा घोष करणा-या संतसंगतीमुळे हरिनामाची गोडी वाढते. अंत:करण शुध्द व परिणामकारक होते. आत हरि बाहेर हरि । हरिने घर कोंडीले ।। श्रीहरिची भेट झाल्यावर स्वत:चे कर्तेपण व जगाचे खरेपण लोपून जाते व दाही दिशांना आत्मारामच दृष्टीस पडतो. ज्या प्रमाणे कापूर जळून अग्नि लुप्त होतो. समुद्राला मिळाल्यानंतर गंगेचे अस्तित्व संपते. त्याप्रमाणेच नामस्मरणात तल्लीन होऊन ‘स्व’ संपून परमात्माची प्राप्ती होती. असे ह.भ.प. शंकर महाराज म्हणाले. सोमवारी तुकारामाचा जन्म बालपण यावर नाटिका सादर करुन प्रवचन केले.
रविवारी (दि. 23) काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. तसेच 23 ऑक्टोबरच्या पर्यंत रोज सकाळी पहाटे पाच ते सात वेळेत पतंजली योग शिबिर होणार आहे.
संतांच्या माध्यमातून परमात्याची प्राप्ती होते…..ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे
