पिंपरी (दि. 17 ऑक्टोबर 2016) भागवत धर्माचा वारसा इंद्रायणी तीरावर वसलेल्या देहु, आळंदीने जपला आहे. सर्व समाजावर अध्यात्मिक संस्कार करणारा संतांच्या मार्गदर्शनाचा व प्रवचनाचा उपक्रम गेली पाचवर्षे श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्यावतीने राबविला जातो हे अभिनंदनीय आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून केले जाणारे हे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. तसेच वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणा-या ज्येष्ठांचा आणि सैनिक व पोलिसांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचा सन्मान केला जातो यांचे इतर संस्थांनी अनुकरण करावे. असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
भोसरी येथे श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि.16) ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांच्या ‘तुका झालासे कळस’ हे प्रवचन आळंदी रोडवरील सखुबाई गवळी उद्यानात आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन खा. बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे, प्रा. शिवलिंग ढवळेश्वर, लक्ष्मण जगताप, प्रविण लोंढे, दिगंबर ढोकले, दत्तात्रय गायकवाड, गणेश लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी लिखित हरिपाठ रसायन या ग्रंथाचे प्रकाशन खा. बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी निरुपण करताना सांगितले की, ‘जीवन शुध्दतेसाठी केदारनाथ किंवा कैलास मानसरोवर यात्रा करावी असे काही नाही तर संसारी जीवनात संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दाखवून दिलेल्या मार्गाने कर्म केले तर आपले जीवन शुध्द होईल. भागवत धर्मावर आजपर्यंत अनेकदा आक्रमणे झाली. परंतू इंद्रायणी तीरावर जन्मलेले संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्यांची हत्या या परिसरात झाली त्या शंभूराजांनी भागवत धर्म टिकवला आणि वाढविला. आता ज्येष्ठांनी युवा पिढीला भागवत धर्म समजावून सांगण्याची वेळ आली आहे. संत तुकारामांनी अभंगाव्दारे ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । इतरांनी वाहवा भार माथा ।। असे परखड लिहून समाज जागृती केली. भक्ती ज्ञान आणि वैराग्य याचे मुर्तीमंत उदाहरण तुकाराम महाराज आहेत. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्नं करुं ।। असे शब्दांवर प्रभूत्व दाखवून जातीभेदावर ओरखडे ओढले सर्व भेदभावाच्या पलीकडे जाऊन त्यांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. असे ह.भ.प. शंकर महाराज म्हणाले.
रविवारी (दि. 23) काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. तसेच 23 ऑक्टोबरच्या पर्यंत रोज सकाळी पहाटे पाच ते सात वेळेत पतंजली योग शिबिर होणार आहे.
भागवत धर्माचा वारसा इंद्रायणीने जपला आहे…..खासदार बारणे लोंढे प्रतिष्ठानचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे…..खासदार बारणे
