पिंपरी (दि. 16 ऑक्टोबर 2016) जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मानवतेच्या विचारांची शिदोरी भावी पिढीला समजण्यासाठी ‘तुका झालासे कळस’ अशा अध्यात्मिक ज्ञानामृत सोहळ्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवडच्या महापौर शंकुतला धराडे यांनी भोसरी येथे केले.
भोसरी येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्यावतीने 16 ते 23 ऑक्टोबरच्या कालावधीत अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांच्या सुश्राव्य वाणीतून तुका झालासे कळस ज्ञानामृत सोहळा ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. याची सुरुवात शनिवारी (दि.15) आळंदी रोडवरील सखुबाई गवळी उद्यानात झाली. यावेळी त्यानंतर जागतिक अंध दिनानिमित्त अंध विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, माजी सैनिक आणि पोलिस अधिका-यांचा सैन्य मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार महापौर धराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी शहराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे, ॲड. नितीन लांडगे, जालींदर शिंदे, सुरेश म्हेत्रे, नगरसेविका आशा सुपे, अनुराधा गोफणे, शुभांगी लोंढे, मंदा आल्हाट, सुरेखा गव्हाणे, माजी नगरसेवक पंडीत गवळी, ज्ञानेश्वर भालेराव, संतोष लोंढे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पै. पोपट फुगे, बाळासाहेब गव्हाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथ दिंडी आणि माजी सैनिक आणि पोलिस अधिका-यांची त्यांच्या कुंटूंबियांसमवेत भोसरी परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे यावेळी म्हणाले की, सीमेवर देशाचे संरक्षण करणारे सैनिक आणि देशात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वेळ प्रसंगी प्राणाची आहुती देणा-या सैनिक व पोलिसांमुळेच आपण शांततेत जीवन जगत आहोत. त्यांच्या प्रती कृतज्ञता व युवकांना संरक्षण क्षेत्रात व पोलिस खात्यात जाण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून अशा कार्यक्रमांचे संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात येते.
ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे हे विश्वभंरबाबा व अमाई माता कथा, श्री तुकोबारायांचा जन्म, बालपण, विवाह कथा, संसार स्थिती, व्यापार, जिजामाता कथा, व्यापाराचे दिवेळे, सद्गुरू भेट, श्री पांडुरंग भेट, चिंतामणी देव, मंबाजी बुवा, रामेश्वर शास्त्री, अनगड शहा, कोंडाबास प्रसाद प्राप्ती, श्री छत्रपती शिवराय भेट, वैकुंठगमन सोहळा यावर आधारित कथा सांगणार आहेत. रविवारी (दि. 23) काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.
तसेच 23 ऑक्टोबरच्या पर्यंत रोज सकाळी पहाटे पाच ते सात वेळेत पतंजली योग शिबिर होणार आहे. त्यामध्ये वसंतराव पाटील, डॉ. नारायण हुले, हिरामण भुजबळ, धनीलाल यादव, प्रा. ढवळेश्वर सर मार्गदर्शन करणार आहेत.
स्वागत ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, सूत्रसंचालन दिगंबर ढोकले व सुरेश धनवे आभार प्रविण लोंढे यांनी मानले.
मानवतेच्या विचारांची शिदोरी भावी पिढीला समजण्यासाठी ज्ञानामृत सोहळ्याची गरज…..महापौर धराडे
