पिंपरी : कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी शिकवण देणारे. ‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती॥’ पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत, अखंड कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रम्हभूत झाली, असे साक्षात्कारी विठ्ठल भक्त, जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला भक्तीतून परमात्म्याचा मार्ग दाखविणारे आणि भागवत धर्माचा कळस झालेले ‘जगद्गुरु’ संत म्हणजे तुकाराम महाराज होय, असे मार्गदर्शन हभप शंकर महाराज शेवाळे
यांनी केले.
भोसरी येथे श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी (दि. 21) हभप शंकर महाराज शेवाळे यांच्या ‘तुका झालासे कळस’ हे प्रवचन आळंदी रोडवरील सखुबाई गवळी उद्यानात आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, हभप येवले महाराज, हभप इंगवले महाराज, शांताराम ताम्हाणे, प्रा. एस. आर. शिंदे, प्रविण लोंढे, दिगंबर ढोकले, गणेश लोंढे आदी उपस्थित होते. या वेळी स्थानिक कलाकारांनी ‘रामेश्वर शास्त्रीचा तुकाराम बरोबर वाद, अनगड शहा, कोंडाबास प्रसाद प्राप्ती, रामेश्वर भट झाले तुकाराम भक्त, इंद्रायणीत गाथा तरल्या’ हे प्रसंग नाट्यरुपात सादर केले.



















